औरंगाबाद : विद्युत मोटारीची जोडणी करतांना विजेचा धक्का लागुन एका एकोणीस वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना वरठाण (ता सोयगाव) येथे शुक्रवारी (दि.२३) दुपारी घडली.
मृत तरुणाचे नाव आकाश रावसाहेब जाधव (वय १९) असे आहे.
नळाला पाणी आल्याने विद्युत मोटार नळास जोडणी केल्याशिवाय पाणी भरणे होत नाही. शुक्रवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास नळाला पाणी आले असता आई वडील शेतीकामाला तर मोठा भाऊ पाचोरा येथे कामाला गेलेला होता. आकाश एकटाच घरी असल्याने नळाला विद्युत मोटारीची जोडणी करीत असताना त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. यात तो जागेवर बेशुद्ध पडला.
यावेळी शेजारच्या तरुणांनी तात्काळ आकाशाला पाचोरा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी आकाशला मृत घोषित केले. वरठाण येथील स्मशानभूमीत आकाशवर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आजी,वडील,आई, एक भाऊ असा परिवार आहे.