राजधानी दिल्लीमध्ये घडलेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला. त्या घटनेविरोधात अजूनही तीव्र पडसाद उमटत आहेत. त्या धक्क्यातून देशातील महिला वर्ग, तरुणी तसेच संपूर्ण देश अजून सावरलेला नाही.
तो गुन्हा उघडकीस येऊन काही दिवस उलटत नाही तोच झारखंडमध्ये आणखी एक भयानक घटना समोर आली आहे. या घटनेतील आरोपीने त्याच्या पत्नीची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाचे तब्बल 50 तुकडे केले. पोलीस तपासात ही धक्कादायक बाब समोर आली आहे. रिबीका पहाडीन असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून 25 वर्षीय दिलदार अन्सारी असे हत्या करणाऱ्या पतीचे नाव आहे.
महिनाभरापूर्वी झाले होते लग्न
विशेष म्हणजे दोघांचे महिन्यापूर्वी लग्न झाले होते. दिलदारचे हे दुसरे लग्न होते. दिलदारची पत्नी देखील या जोडप्यासोबत राहायची. पहिल्या पत्नीचा या लग्नाला विरोध होता. याच विरोधातून घरामध्ये वारंवार भांडणे व्हायची.
अखेर दिलदारने हा वाद कायमचा संपवण्यासाठी रिबिकाची हत्या करण्याचा प्लॅन आखला. मात्र त्याने केलेले कृत्य सर्वांच्याच अंगावर काटा उभा करत आहे.
श्रद्धा वालकर या दिल्लीतील तरुणीची तिच्या प्रियकराने हत्या करुन 35 तुकडे केले होते, तर रीबिकाची हत्या केल्यानंतर आरोपी दिलदारने तिच्या मृतदेहाचे तब्बल 50 तुकडे केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
इलेक्ट्रिक कटरच्या मदतीने केले मृतदेहाचे तुकडे
रीबिकाच्य मृतदेहाची तुकडे करण्यासाठी आरोपी दिलदारने इलेक्ट्रिक कटरचा वापर केला. पोलीस तपासामध्ये आतापर्यंत 18 तुकडे जप्त करण्यात आले आहेत. अद्याप रीबिकाच्या डोक्याचा पत्ता लागलेला नाही.
आरोपीने मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी मृतदेहाचे तुकडे फेकले होते. काही तुकडे घरामध्ये लपवले होते, तर काही तुकडे परिसरातील निर्जन ठिकाणी फेकले होते. कुत्र्यांकडून ते तुकडे खाल्ले जात होते हे परिसरातील लोकांनी पाहताच हत्येचा संशय आणखी बळावला.
आदिवासी समुदायातील होती रुबिका
हत्या करण्यात आलेली रीबिका ही आदिवासी समाजातील होती. ती साहेबगंज परिसरातील डोंगराळ भागात असलेल्या डोडा लोकवस्तीत राहायची. आधीच विवाहित असलेल्या दिलदारसोबत तिने महिनाभरापूर्वीच लग्न केले होते. दोघांच्या लग्नाला दोन्ही घरांकडून विरोध होता.
रिबीका तिच्या सहा भावंडांमध्ये तिसऱ्या क्रमांकाची मुलगी होती. शनिवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.