उंदराच्या शेपटीला दगड बांधून हत्या,उंदराचं शव पोस्ट मॉर्टेमसाठी,पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट आल्यानंतर आरोपींवर कारवाई करण्यात येईल
घरात उंदीर झाले की खाण्या-पिण्याच्या वस्तू आणि कपड्यांचं नुकसान होण्याची भीती असते. त्यामुळे त्या उंदरांना मारण्यासाठी किंवा पळवून लावण्यासाठी विविध प्रकारचे उपाय केले जातात.
उंदीर बीळ करून राहतात. त्यामुळे त्यांना मारणं अथवा पकडण कठीण होऊन जातं. उंदीर पकडण्यासाठी, मारण्यासाठी अनेक प्रकारची औषधं बाजारात मिळतात. त्यांच्या साह्याने उंदीर मारणं ही बाब बहुतांश घरांमध्ये केली जाते; पण उंदराला मारणं एका व्यक्तीला महागात पडलंय.
केवळ मजा घेण्यासाठी म्हणून उंदराला मारणाऱ्या एका व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातल्या बदायूंमध्ये घडली आहे. या संदर्भातलं वृत्त ‘आज तक’ने दिलं आहे. उत्तर प्रदेशातल्या बदायूंमधल्या एका पोलीस ठाण्यात शुक्रवारी (25 नोव्हेंबर) एक असामान्य तक्रार प्राप्त झाली.
उंदीर मारल्याप्रकरणी तरुणावर कारवाई करावी, अशी ती तक्रार होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज कुमार नावाच्या तरुणाने जिवंत उंदराच्या शेपटीला दगड बांधून नाल्यात फेकलं. उंदराला वाचवण्यासाठी नाल्यात उतरलेले प्राणीहक्क कार्यकर्ते बिकेंद्र शर्मा या घटनेची पोलिसांना माहिती दिली.
आरोपी एका पुलावर बसून उंदराच्या शेपटीला दगड बांधून त्याला त्रास देत होता, तेव्हा तेथून जात असलेले प्राणी हक्क कार्यकर्ते बिकेंद्र शर्मा यांनी त्याला तसं करण्यापासून रोखलं.
त्यानंतर आरोपीने दगडासह उंदराला निर्दयीपणे नाल्यात फेकून दिलं. बिकेंद्र यांनी नाल्यात जाऊन उंदराला वाचवण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याचा मृत्यू झाला होता. याचा बिकेंद्र यांना इतका राग आला, की त्यांनी मेलेला उंदीर घेऊन पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार दाखल केली. डेप्युटी एसपी (शहर) आलोक मिश्रा यांनी सांगितलं, की आरोपीला पोलीस ठाण्यात बोलावण्यात आलं आणि तक्रारीच्या आधारे उंदराचं शव पोस्ट मॉर्टेमसाठी बदायूंच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे.
तिथील कर्मचाऱ्यांनी चाचणीस नकार दिल्यानंतर ते बरेलीतल्या भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेकडे (आयव्हीआरआय) पाठवण्यात आलं आहे. पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट आल्यानंतर आरोपींवर कारवाई करण्यात येईल, असं ते म्हणाले. पशू क्रूरता प्रतिबंधक कायदा लागू होणार नाही आरोपीने उंदराचा जीव घेतल्याप्रकरणी त्याच्यावर पशू क्रूरता प्रतिबंधक कायदा लागू होणार का, असं विचारलं असता मिश्रा म्हणाले, की हा कायदा या प्रकरणात लागू होत नाही. कारण उंदीर त्या श्रेणीत येत नाही. या प्रकरणी कायदेशीर बाबी जाणून घेण्यात येत असून त्यानुसार कारवाई केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं.