ताज्या बातम्या

वानराच्या दहशतीने गाव परेशान, वानराच्या करामतींमुळं त्रस्त, गावात प्रत्येक व्यक्तीच्या हातात काठी


वानराच्या दहशतीने लातूरमधील गाव परेशान आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात सोनखेड नावाचं गाव वानराच्या करामतींमुळं त्रस्त झालं आहे. अडीच हजार लोकसंख्या असलेल्या या गावात मागील चार ते पाच दिवसापासून एका वानराने अक्षरशः दहशत निर्माण केली आहे.
50 पेक्षा अधिक गावकऱ्यांना या वानरानं चावा घेतला आहे. आता या वानराला पकडण्यासाठी वन विभागाची टीम गावात दाखल झाली आहे. मात्र हे वानर काही केल्या कोणाच्याही हाती लागत नाहीये.

सोनखेड गावात प्रत्येक व्यक्तीच्या हातात काठी आहे. काठीशिवाय बाहेर पडणे मुश्किल आहे. मागील तीन दिवसापासून रोज हे वानर गावकऱ्यांवर हल्ला करत आहे. वानराच्या चाव्यामुळे गंभीर जखमी झालेल्या लोकांची संख्या वाढत चालली आहे. याची माहिती वन विभागाला मिळाल्यानंतर त्यांचे एक पथक गावात दाखल झाले आहे. काल दिवसभर वानराला पकडण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. मात्र त्यात यश आले नाही.

वन विभागाच्या पथकाने जाळे लावले होते. मात्र वन विभागाच्या पथकाच्या लोकांनाही या वानराच्या हल्ल्याचा सामना करावा लागला आहे. तीन कर्मचाऱ्यांवर या वानराने हल्ला चढवला.
निलंगा तालुक्यातील सोनखेड, जामगा आणि बोरसुरी या भागात अनेक वानरांच्या टोळ्या आहेत. आजपर्यंत या टोळ्या फक्त शेतीच्या नुकसानीपर्यंत सीमित होत्या. त्यांनी कधीही लोकांवर हल्ला केला नाही, मात्र मागील दोन ते तीन दिवसापासून एक वानर लोकांवर हल्ला करत आहे. आतापर्यंत वानराच्या हल्ल्यात 50 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत.

सगळे प्रयत्न अयशस्वी

या वानराला पकडण्यासाठी गावकऱ्यांसह वनविभागाने अनेक प्रयत्न केले. गावात पिंजरे लावले गेले आहेत. जाळ्या लावल्यात मात्र काही केल्या हे वानर जाळीत सापडत नाहीये. फटाक्याचे मोठे आवाज केले जात आहेत त्यालाही तो वानर भीत नाही. वन विभागाचे पथक आणि गावातील तरुण सातत्याने प्रयत्न करत आहेत मात्र हे वानर हाती लागत नाही.

औरंगाबाद येथून वन विभागाचे पथक येणार

लातूर जिल्ह्यातील वन विभागाच्या पथकाने विविध प्रकारे वानरास जेरबंद करण्यासाठी प्रयास केले मात्र यश आले नाही, त्यामुळे आता औरंगाबाद येथील पथकास पाचारण करण्यात आले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *