राहुल गांधींची पदयात्रा आज ओंकारेश्वर ते इंदूरकडं निघाली असताना चहापानाच्या वेळी धक्काबुक्की झाली.
काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रेच्या (Bharat Jodo Yatra) दौऱ्यात आहेत.
मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) पदयात्रेचा आज चौथा दिवस आहे. यानंतर राहुल गांधी आपल्या टीमसह राजस्थानमध्ये दाखल होणार असून, तिथं अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांची भेट घेणार आहेत.
राहुल गांधींची पदयात्रा आज ओंकारेश्वर ते इंदूरकडं निघाली असताना चहापानाच्या वेळी धक्काबुक्की झाली. यादरम्यान पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह खाली जमिनीवर कोसळले. त्यानंतर तिथं उपस्थित समर्थक आणि सुरक्षा दलांनी त्यांना मदतीचा हात देवून जमिनीवरुन वरती उठवलं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या घटनेत दिग्विजय सिंह (Digvijay Singh) यांना गंभीर दुखापत झालेली नाही. त्यांची तब्येत बरी असल्याचं दिसून येत असून ते प्रवासाला पुढं जात आहेत. दिग्विजय सिंह देखील आज राहुल गांधींसोबत पायी चालताना दिसत आहेत. बरवाहपासून चार किमी अंतरावर चोर बावडीजवळ एका हॉटेलमध्ये राहुल गांधी अचानक चहासाठी थांबले. त्यावेळी तिथं चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली, त्यामुळं दिग्विजय सिंह जमिनीवर कोसळले. या प्रकारानंतर दिग्विजय सिंह यांनी नाराजी व्यक्त केली.
आज राहुल गांधींची ही यात्रा खरगोन जिल्ह्यातील मनिहार, बलवाडा मार्गे महूला पोहोचेल. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या स्मारकाला राहुल गांधी भेट देणार आहेत. यानंतर ते एका सभेला संबोधितही करतील. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी मुख्यमंत्री कमलनाथ, माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्यासह देशातील आणि राज्यातील सुमारे 40 नेते उपस्थित राहणार आहेत.