भंडारा येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत प्रथम ओळख निर्माण करून तिच्या व्हॉट्सॲपवर मॅसेज करून जवळीकता साधली.
त्यानंतर तिच्यावर शहरासह शहराबाहेरील अनेक हॉटेलवर वेळोबेळी बळजबरी अत्याचार ( Sexual assault) केल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी (Bhandara Police) राजीक मतीन शेख (26 रा. सौदागर मोहल्ला ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.
भंडारा शहरातील मुस्लिम लायब्ररी चौकात आरोपीचे अत्तरचे दुकान आहे. दीड महिन्यापूर्वी पीडित 17 वर्षीय मुलगी आरोपी राजीकच्या दुकानात अत्तर घ्यायला गेली होती. मात्र, त्यावेळी मुलीला हवे असलेले अत्तर मिळाले नाही. यावेळी आरोपीने मुलीचा मोबाईल नंबर घेवून तिच्याशी व्हॉट्सॲपवर चॅटिंग सुरू केली. यातून दोघांमध्ये जवळीक निर्माण झाल्यानंतर आरोपीने तिला एक दिवस शहरालगत असलेल्या कोका अभयारण्यालगत असलेल्या एका हॉटेलवर नेवून तिच्यावर अत्याचार केले. यावेळी तिचे अश्लील फोटो काढले. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने मुलीवर तिच्या घरी आणि भंडारा शहरातील ‘रामलीला’ हॉटेलवर अत्याचार केला. हा सर्व प्रकार जवळपास दीड महिना सुरू होता, अखेर पीडितेने आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराबाबची तक्रार पोलिस ठाण्यात दिली. पीडितेच्या तक्रारीनंतर संशयित तरूणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.
पीडितेच्या तक्रारीनंतर या प्रकरणी भंडारा पोलिसांनी आरोपी राजीक खान याच्याविरुद्ध कलम 354 (ड), 376, 4, 8 पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे, अशी माहिती भंडारा जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांनी दिली आहे.
दरम्यान, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस या पकरणाचा कसून तपास करत आहेत. लकरच याबाबतची संपूर्ण चौकशी केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. संशयित आरोप सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिस त्याच्याकडे अधिक चौकशी करत आहेत. दरम्यान, या प्रकरणी संशयित तरूणावर कठोरातील कठोर कावाई करण्यात यावी अशी मागणी परिसरातून होत आहे.