नंदुरबारमध्ये (Nandurbar) घराच्या अंगात जेवण करणाऱ्या महिलेवर बिबट्याने हल्ला केला. यानंतर तिला फरफटत नेऊन ठार केलं. मोगराबाई रुमा तडवी असं या महिलेचं नाव आहे. अक्कलकुवा तालुक्यातील डाबचा मालीआंबा इथे ही हृदयद्रावक घटना घडली.
या घटनेमुळे परिसरात भीतीयुक्त वातावरण पसरलं आहे. वन विभागाने या परिसरात असणाऱ्या हिंस्त्र प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?
मोगराबाई रुमा तडवी (वय 55 वर्षे) या रात्री नऊच्या सुमारास मालीआंबा इथे आपल्या राहत्या घराच्या अंगणात जेवण करत असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवून फरफटत नेलं. यावेळी घरात कोणीच नसल्याने असहाय्य झालेल्या मोगराबाई तडवी यांना बिबट्याने घरापासून सुमारे वीस ते पंचवीस मीटर अंतरावर नेऊन त्यांचं शरीर छिन्नविच्छिन्न केलं.
सकाळी बिबट्या मृतदेहाचे लचके तोडताना दिसला
यानंतर रात्री मोगराबाई तडवी यांचे पती आणि मुलगा घरी आले. मोगरबाई घरात न दिसल्याने त्यांनी आवाज दिला. जंगल परिसर असल्यामुळे घराशेजारी अंधार होता. त्या अंधारात त्यांनी मोगराबाई यांचा शोध घेतला परंतु त्या दिसल्या नाहीत. मग रात्री तीनच्या सुमारास पुन्हा एकदा मोगराबाई यांना आवाज दिला आणि शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा देखील त्या दिसल्या नाहीत. मग सकाळी सहाच्या सुमारास उजाडल्यानंतर दोघांनीही त्यांचा पुन्हा शोध घेतला. त्यावेळी घरापासून 20 ते 25 मीटर अंतरावर असलेल्या टेकडीवर बिबट्या मोगराबाई यांचा मृतदेहाचे लचके तोडत होता, अशी माहिती त्यांच्या मुलाने दिली.
घटनेची माहिती डाबचा मालीआंबा गावाच्या सरपंचांना देण्यात आली. तसंच वन विभाग आणि पोलिसांनाही कळवण्यात आलं. माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली. अधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणाची पाहणी करुन पंचनामा करण्यात आला.