नागरिकांनी चौकशी केल्यानंतर मृतदेह घेऊन येणाऱ्या व्यक्तीने महिलेचा मृत्यू पडल्यामुळे झाला असून, मृतदेह तिच्या गावी पाठवायचा आहे, असे सांगून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिस आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे प्रकरणाचा उलगडा झाला. शिरखेड पोलिसांनी प्रकरण संयमाने हाताळले, अकस्मात मृत्यू अशी नोंद घेतली. घटनास्थळामुळे तपासाकरिता प्रकरण औरंगाबादच्या पोलिसांकडे वर्ग केले.
शिरखेड : औरंगाबादच्या वाळूज एमआयडीसी परिसरात महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिस कारवाई टाळण्यासाठी शवविच्छेदन न करताच मृतदेह औरंगाबाद वरून शिरजगाव कसबा, अमरावतीत आणल्यानंतर नागपुरात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आला.
साडेचारशे ते पाचशे किलोमीटर मृतदेहासह रुग्णवाहिकेने प्रवास केला. शिरसगाव कसबा येथील गंगा बबलू काळे (वय २८) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही महिला आठ महिन्यांपासून औरंगाबाद येथील वाळूज एमआयडीसीत एका कंपनीमध्ये काम करून तेथेच एका खोलीत राहत होती. तिने दोन दिवसांपूर्वी राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. रा घटनेची माहिती पोलिसांना न देताच कंपनी मालकाने रुग्णवाहिका करून सोबत एका व्यक्तीला पाठवून मृतदेह शिरजगाव कसबा येथील तिच्या नातेवाइकाकडे पोचून देण्याची व्यवस्था केली.
मृतदेह असलेली रुग्णवाहिका शुक्रवारी (ता. १४) वरला फाट्याजवळ चालकाने थांबवून शिरसगाव कसबाकडे जाण्याचा रस्ता नागरिकांना विचारला. नागरिकांना संशय आल्याने त्यांनी ११२ क्रमांक डायल करून या घटनेची माहिती शिरखेड पोलिसांना दिली. शिरखेड पोलिसांनी औरंगाबाद पोलिसांना घटनाक्रम सांगितला. संशयास्पद मृत्यू प्रकरण असल्याने या महिलेचा मृतदेह इन कॅमेरा शवविच्छेदनासाठी नागपूरला शुक्रवारी पाठविण्यात आला व उत्तरीय तपासणीनंतर नातेवाइकांच्या सुपूर्द करण्यात आला.