मध्य रशियातील इझेव्हस्क येथील एका शाळेत गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे युक्रेन युद्धादरम्यान खळबळ माजली आहे. रशियाची अधिकृत वृत्तसंस्था टास (TASS) ने याबाबतचे वृत्त दिले आहे.
गोळीबारात 7 मुलांसह मृतांची संख्या 13 वर पोहोचली आहे. तर 20 जण जखमी झाले आहेत. जखमी व मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. तर हल्लेखोराने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर शाळेमध्ये सुरक्षा आणि मदत बचाव पथके पोहोचली आहेत.
एएफपी न्यूज एजन्सीने अंतर्गत मंत्रालयाच्या हवाल्याने मध्य रशियामधील शाळेत गोळीबार झाल्याचे वृत्त दिले आहे. प्राथमिक अहवालानुसार, मध्य रशियामधील एका शाळेत गोळीबाराच्या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. रशियाच्या इझेव्हस्क शहरातील एका शाळेत एका बंदूकधाऱ्याने गोळीबार केला. ती शाळा रिकामी करण्यात आली असून आजूबाजूच्या परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे.
जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीबाराचा आवाज ऐकल्याने घाबरलेले विद्यार्थी आणि शाळेतील इतर कर्मचारी शिक्षक घटनेच्या वेळी एका छोट्या खोलीत लपून बसले होते. या घटनेचा आधिक तपास सुरू आहेत.