मावळच्या टाकवे बुद्रुक येथून नुकतीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
गावातील स्मशानभूमीत अंधश्रद्धेचा प्रकार समोर आला आहे. याठिकाणी स्मशानभूमीत दशक्रिया विधी सुरू होता.
यावेळी स्मशानभूमीच्या एका कोपऱ्यात एक काळी पिशवी दिसून आली. विशेष बाब म्हणजे या पिशवीमध्ये हालचाल जाणवत असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. ही घटना 17 ऑगस्ट रोजी घडली. स्मशानभूमीमध्ये अशाप्रकारे पडलेल्या काळ्या रंगाच्या पिशवीमध्ये हालचाल जाणवत असल्याने चर्चा सुरू झाल्या.
यानंतर नागरिकांनी ही पिशवी उघडून आतमध्ये नेमकं काय आहे, हे तपासण्याचा प्रयत्न केला. यावेळी आतमध्ये अंधश्रद्धेसाठी वापरणाऱ्या वस्तू आढळून आल्या
एका व्यक्तीने ही पिशवी खोलून पाहिली असता यामध्ये एका लिंबाला टाचण्या टोचलेल्या दिसल्या. त्याला हळदी-कुंकू, आंबीर लावलेलं होतं.
सोबतच एक काळी उलट्या पंखांची कोंबडी यामध्ये होती. त्यामुळे पिशवीमध्ये हालचाल जाणवत होती. आतमध्ये एक नारळही होता, ज्याला वेगवेगळे रंग लावण्यात आले होते. पिशवीमध्ये अंधश्रद्धेसाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तू आढळून आल्या. हा सगळा प्रकार पाहून उपस्थित नागरिकांमध्ये खळबळ उडाली.