बीड मध्ये एबीपी माझानं ज्योती मेटे यांच्याशी बातचीत केली तेव्हा त्यांनी अपघातानंतर घडलेल्या घटनांबाबत संशय व्यक्त केला आहे. अपघातानंतर काय घडलं याची चौकशी व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
ज्योती मेटे बोलताना म्हणाल्या की, “साहेबांशी बोलणं परवा झालं. त्यावेळी त्यांनी 15 ऑगस्ट रोजी बैठक असल्याचं सांगितलं. मी त्यांना रात्री प्रवास करु नका असं सांगितलं. त्यांनी मी हेदेखील सांगितलं होतं की, पुण्यात मुक्काम करा आणि पहाटे निघा. ते आमचं शेवटचं बोलणं.” पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, “शेवटची भेट आमची गुरुवारी झाली. मी नाशिकहून मुंबईला गेले आणि त्यांना मुंबईहून बीडला यायचं होतं. त्यावेळी आम्ही नवी मुंबईपर्यंत एकत्र गेलो. त्यानंतर तिथून मी परत आले.”
“मी तिथे गेल्याबरोबर त्यांची पल्स पाहिली. तिथे डॉक्टरही होते. मी त्यांना सांगितलं, मी त्यांची पत्नी आहे आणि डॉक्टरही आहे. त्यांनी मला परवानगी दिली. मी पल्स चेक केली, त्यानंतर मानेची पल्स चेक केली. ईसीजी समोर फ्लॅट दिसत होता. त्यावेळी मी माझ्या भावाला सांगितलं, हे थोडा वेळात गेलेले नाहीत. अपघातानंतरच्या वेळाची चौकशी होणं गरजेचं आहे.”, असं त्या म्हणाल्या.
“लग्न झाल्यापासून मी साहेबांचं काम पाहतेय. समाज, मग तो कोणताही असो. खासकरुन मराठा समाज त्यांच्या अजेंड्यावर होताच. थोडक्यात सांगायचं तर त्यांचा समाजकार्याचा पिंड होता आणि त्या समाजकारणानंच त्यांचा बळी घेतला.”, असं त्या म्हणाल्या. त्यांच्या जाण्यानं आम्ही आणि अख्खा शिवसंग्राम परिवार पोरका झाला आहे. मी माझ्या परिनं शिवसंग्राम परिवाराला हमी देईन की, माझ्या परिनं मी त्यांची काळजी घेईन, असंही त्या म्हणाल्या.
कसा झाला अपघात?
विनायक मेटे आज पहाटे बीडवरुन मुंबईला येत असताना मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर ही घटना घडली. विनायक मेटे हे मागच्या सीटवर डाव्या बाजूला बसले होते. पुढच्या सीटवर ड्रायव्हरच्या बाजूला त्यांचा बॉडीगार्ड होता. मेटे यांची गाडी हायवेच्या मधल्या लेनमध्ये होती. 10 चाकी ट्रक हा तिसऱ्या लेनला चालत होता. या ट्रकचालकाने तिसऱ्या लेनमधून मधल्या लेनमध्ये येणाचा प्रयत्न केला. यावेळी मेटे यांची गाडी वेगात होती. अचानक ट्रक मधे आल्यानं वेगानं मेटे यांची गाडी ट्रकला धडकली. चालकाला गाडी कंट्रोल करणं जमलं नाही. मेटे यांची गाडी डाव्या बाजूने ट्रकच्या उजव्या बाजूला धडकली. मेटे यावेळी झोपेत होते, त्यामुळं त्यांना काही कळायच्या आत वेगाने धडक बसल्यानं डोक्याला मार बसला. यात मेटे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर बराच वेळ मेटे यांना मदत मिळाली नाही. या अपघातानंतर ट्रकचालक हा फरार झाला होता. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून याचा तपास सुरू केला होता.