नवी मुंबई – कपडे असल्याचे भासवून कुरिअरद्वारे गांजाची तस्करी करण्याचा प्रयत्न तुर्भे सेक्टर-२४ मधील एका कुरिअर चालकाच्या सतर्कतेमुळे फसला.
प्रकरणात ज्या तरुणाने गांजाचे पार्सल कुरियर करण्याचा प्रयत्न केला, त्या तरुणाविरोधात एपीएमसी पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याचा शोध सरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगुसिंग राजपूत (३२) याची तुर्भे सेक्टर-२४ मध्ये कुरिअर एजन्सी आहे. त्याच्याकडे २० जुलै रोजी सायंकाळी एक तरुण दोन बॉक्स घेऊन ते कुरिअर करण्यासाठी आला होता. या तरुणाने दोन्ही बॉक्समध्ये कपडे असल्याचे सांगत ते पार्सल नवी दिल्ली व दिमापूर येथे पाठवण्यासाठी मंगुसिंग याला दिले.
मात्र, त्या तरुणाकडे ओळखपत्र नसल्याने मंगुसिंगने ते पार्सल घेण्यास नकार दिला; पण दुसऱ्या दिवशी त्या तरुणाने ओळखपत्र आणून देणार असल्याचे सांगून पार्सल ठेवण्याची विनंती केली. दुसऱ्या दिवशी या तरुणाने दुसऱ्या व्यक्तीचे आधार कार्ड व कपड्यांच्या बिलाचा कागद मंगुसिंग याला दिला. त्यानंतर हे पार्सल हलके लागल्याने मंगुसिंग याला संशय आला. त्यामुळे मंगुसिंगने मित्राला कार्यालयात बोलवून घेतले.
त्यानंतर दोघांनी दोन्ही बॉक्सची बारकाईने पाहणी केली असता, त्यातून उग्र वास येत असल्याने त्यांनी तात्काळ एपीएमसी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी दोन्ही बॉक्सची पाहणी करून दोन्ही बॉक्स पंचासमोर उघडून पहाणी केली असता, त्यात ४५० ग्रॅम गांजा आढळून आला.