पुणे जिल्ह्यासह पिंपरी-चिंचवड शहरात आज(बुधवार) सकाळ पासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. शहरातून वाहणारी पवना नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीच रौद्र आणि तितकंच सुंदर असं रूप पिंपरी-चिंचवडकरांना पाहण्यास मिळत आहे.
जून महिन्यात पावसाने अक्षरशः दडी मारली होती. पावसाची चिंता नागरिकांना सतावत होती, आपल्यावर पाणी कपातीची कुऱ्हाड निश्चित पडणार असे वाटत असताना, जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने जोरदार आगमन केलं अन् पाणी कपातीचं संकट टळलं.
तर, मुसळधार पावसामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा, महाविद्यालयांना आज आणि उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पावसामुळे नदी, नाले, ओढे ओसंडून वाहात आहेत. पवना नदीवर बांधण्यात आलेला, रावेतचा बंधारा बघण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत.