मुंबई : एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर पक्षाची शिस्त मोडल्याप्रकरणी त्यांची पक्षनेते पदावरुन हाकलपट्टी करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परीपत्रक जारी करत ही कारवाई केली.
शिवसेना पक्ष संपवण्याच्या हेतूने ईडी नावाची तलवार शिवसेनेच्या आमदारांच्या मानेवर ठेवल्याने त्यांनी बंड केलं, असा दावा सेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला.
मलाही गुवाहाटीची ऑफर आली होती. मात्र, मी बाळासाहेबांना मानतो म्हणून गेलो नाही, असा दावा संजय राऊतांनी केला आहे. शिंदे गटाकडून फसवणूक केली जात आहे. लोकांना फसवणं ही भाजपची पद्धत आहे. शिवसेनेतून बाहेर पडलेले लोकही भाजपसारखेच वागत असल्याचं राऊत म्हणालेत.
संजय राऊत म्हणाले, भाजपचा मुंबई महानगरपालिकेवर डोळा आहे. त्यांना सेनेची मुंबईतील ताकद कमी करायची आहे. त्यामुळे ते शिंदे गटाच्या खांद्यावर बंदूक ठेऊन चालवत आहेत. तसेच माझ्याकडेही गुवाहाटीला जाण्याचा पर्याय होता, मात्र मी ईडी चौकशीला सामोरे गेलो. सत्य तुमच्या बाजूने असेल तर घाबरण्याचं कारण नाही. मी बॅग भरून आलो आहे, असं ईडी अधिकाऱ्यांना सांगितल्याचं राऊत म्हणालेत.
संजय राऊत यांची ईडी कडून 10 तास चौकशी चालली. यावेळी त्यांचा जबाबही नोंदविण्यात आला. गोरेगाव येथील पत्राचाळीच्या 1 हजार 39 कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही चौकशी करण्यात आली.