उत्तर प्रदेशमधील औरेया येथे एका महिलेने तिच्या पतीला त्याच्या गर्लफ्रेंडसोबत बाजारात रंगेहाथ पकडले. त्यामुळे संतापलेल्या त्या महिलेने तिच्या धोकेबाज पतीला भर बाजारात धू धू धुतले.तिने पतीला एवढे मारले की तो पती चक्क बेशुद्ध झाला व पत्नीचा रुद्रावतार पाहून पतीच्या गर्लफ्रेंडने मात्र तेथून पोबारा केला. ती गर्लफ्रेंड ही त्या महिलेच्या भावाची बायकोच होती.
सदर महिला व तिचा पती हा बिधूना भागात राहतात. या महिलेला तिच्या पतीचे तिच्याच भावाच्या बायकोसोबत प्रेमसंबध असल्याचा संशय होता. मात्र पती नेहमी तसं काही नसल्याचं सांगायचा. त्यावरून त्यांचे सतत वाद व्हायचे. अनेकदा पतीने तिला संशय घेतला म्हणून मारहाण देखील केली आहे.
सदर महिला गुरुवारी बाजारात घरातलं सामान आणायला गेली होती. तेव्हा तिला तिचा पती व तिची वहिनी हातात हात घालून फिरताना दिसले. ते पाहून महिलेचा पारा चढला. तिने तत्काळ पतीला पकडले व मारहाण करायला सुरुवात केली. तिचा तो रुद्रावतार पाहून तिच्या वहिनीने तेथून पळ काढला. त्यामुळे ती बचावली. बाजारातील लोकांनी मोठ्या मुश्किलीने महिलेची समजूत काढून शांत केले. मात्र तोपर्यंत मार खाऊन खाऊन तिचा पती अर्धमेला झाला होता.