सोलापूर : म्हैसाळ (ता. मिरज) येथील एकाच कुटुंबातील नऊ जणांची आत्महत्या नसून त्यांना विष देऊन मारण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे. त्याचा मुख्य सूत्रधार अब्बास मोहम्मदअली बागवान (रा.सरवदे नगर, सोलापूर) व धीरज चंद्रकांत सुरवसे (रा. वसंतविहार, सोलापूर) हे असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. त्यांनी गुप्तधनासाठी वनमोरे कुटुंबियांकडून घेतलेले ८० लाख रुपये परत द्यावे लागतील म्हणून हे कृत्य केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे
कोट्यवधींचे गुप्तधन मिळवून देतो म्हणून अब्बास बागवान याने वनमोरे कुटुंबियांना त्यांच्या जाळ्यात ओढले. गुप्तधनाच्या आशेने त्यांनी अब्बास बागवान याला तब्बल ७० ते ८० लाख रुपये दिले होते. त्यासाठी वनमोरे कुटुंबियांनी त्यांच्या नातेवाईकांसह खासगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले होते. काही दिवसांत पैसे देतो म्हणून घेतलेली रक्कम परत मिळत नसल्याने सावकारांनी वनमोरे कुटुंबियांकडे तगादा लावला होता. तर त्यांनी अब्बास यांनाही संपर्क साधून गुप्तधनाविषयी सातत्याने विचारणा केली होती. अनेक दिवस झाल्यानंतरही गुप्तधन मिळत नसल्याने वनमोरे कुटुंबियांनी अब्बास याच्याकडे पैशांची मागणी केली. घेतलेली एवढी मोठी रक्कम परत द्यावी लागेल, त्यातून आपला भोंदूपणा उघड होईल म्हणून अब्बास बागवान व धीरज सुरवसे या दोघांनी वनमोरे कुटुंबियांना महापूजेसाठी जमा केले. त्यानंतर जेवणातून ना रंग ना वास असलेले विष देऊन पोपट यल्लाप्पा वनमोरे, संगीता पोपट वनमोरे, अर्चना पोपट वनमोरे, शुभम पोपट वनमोरे, माणिक यल्लाप्पा वनमोरे, रेखा माणिक वनमोरे, आदित्य माणिक वनमोरे, अनिता माणिक वनमोरे आणि अक्काताई वनमोरे या नऊ जणांना संपविले, अशी प्राथमिक माहिती पोलिसांसमोर आली आहे. त्या दोघांनाही सांगली पोलिसांनी अटक केली
वनमोरे यांच्या कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी सर्वच बाजूंनी तपास सुरु ठेवला. घटनास्थळावरून त्यांना एक चारचाकी जाताना दिसली. एमएच-१३ पासिंग असल्याने सांगली पोलिसांनी ती गाडी कोणाची आहे, याचा तपास केला. तर वनमोरे यांच्या मोबाईलवरून ते कोणाकोणाच्या संपर्कात होते, याचा ‘सीडीआर’ (कॉल डिटेल्स) काढला. त्यावेळी वनमोरे यांनी अब्बास व धीरज यांच्याशी संपर्क केल्याची माहिती समोर आली. पण, त्यांनी सांगलीतील एका व्यक्तीच्या नावे सीमकार्ड घेतले होते. त्यामुळे त्या दोघांचा पूर्वनियोजित कट होता, असाही पोलिसांना संशय आहे.
आठ वर्षांपूर्वी अब्बासविरूध्द सोलापुरात गुन्हा
सोलापुरातील जेलरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका मध्यमवर्गीय कुटुंबाला गुप्तधन मिळवून देतो म्हणून अब्बास बागवान याने फसविले होते. जेलरोड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जफर मोगल यांनी त्या गुन्ह्याचा तपास केला होता. या गुन्ह्यातून तो काही दिवसांनी सुटला. पण, त्याने मांत्रिकी सोडली नाही.