पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) यांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी मोठ्या संख्येनं वारकरी उपस्थित होते.सर्वांनाच या कार्यक्रमाची उत्सुकता लागली होती. अखेर या मंदिराचे लोकार्पण झालं आहे. यावेळी वारकऱ्यांनी संत तुकराम महाराजांचा नामघोष केला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
मोठ्या उत्साहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे यावेळी वारकऱ्यांनी स्वागत केले. जगदगुरु संत तुकाराम महाराजांची गाथा इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवल्यानंतर अभंग गाथा इंद्रायणीच्या पाण्यातून तरली आणि वर आली. तोपर्यंत तुकाराम महाराजांनी 13 दिवस अन्नपाणी ग्रहण केलं नाही. तुकाराम महाराज 13 दिवस ज्या शिळेवर उपोषणाला बसले होते, तीच शिळा भाविकांच्या दर्शनासाठी तपोवन महाराजांनी देहू मंदिरात आणून ठेवली होती. त्या शिळेवर भव्यदिव्य मंदिर असावं असा वारकरी संप्रदायाचा आग्रह होता. म्हणून देहूतील मुख्य मंदिरात ही स्थापीत केली असून मंदिरास शिळा मंदिर असे संबोधले जात आहे.मंदिरात स्थापित केलेल्या दगडाचे तुळशी वृंदावन आहे. पूर्वीच्या मंदिरात तुकाराम महाराजांची मूर्ती आणि मंदिरावर कळस नव्हता. त्या शिळा मंदिरात अखंड काळ्या पाषाणाची 42 इंच सुबक मूर्ती आहे. तर मंदिरावर 36 कळस स्थापन करण्यात आले आहेत. संत तुकाराम महाराजांचं आयुष्यमान 42 वर्षाचं असल्यानं शिळा मंदिराची कळसापर्यंतची उंची 42 फुटांची आहे. शिळा मंदिरातील संत तुकोबांच्या मूर्तीची उंची 42 इंच आहे. संत तुकोबांची काळ्या पाषाणातील ही मूर्ती 42 दिवसांमध्ये उभारली आहे. ही मूर्ती शिल्पकार चेतन हिंगे, पिंपरी चिंचवड यांनी तयार केली आहे. सर्वोदय भारत शिल्पकला कन्ट्रक्शन ग्रुप प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला हे मंदिर उभारणीचं काम देण्यात आलं होतं. मंदिराची रचना ही हेमाडपंथी आहे. मूळ गर्भगृह 14×14 एवढ्या आकाराचे आहे. अंतर गर्भगृह 9×9 उंची 17×12 एवढी आहे. मंदिराची उंची 42 फूट आहे. यासाठी एकूण खर्च हा 1 कोटी 17 लाख 47 हजार 500 रुपये आला आहे.
विमानतळावर स्वागतासाठी आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोदींनी जवळ जाऊन विचारपूस केली. त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. हे छायाचित्र प्रसिद्ध झाल्यानंतर आता त्याची चर्चा सुरू झाली आहे.पंतप्रधान मोदी विमानतळावर आल्यानंतर प्रोटोकॉलप्रमाणे त्यांचे स्वागत करण्यात येत होते
‘जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा’ हाच मंत्र पंतप्रधान मोदी यांनी स्वीकारला
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तुकोबारायांचं दर्शन घेऊन व्यासपीठावर दाखल झाले यावेळी व्यासपीठावरून आपलं मनोगत व्यक्त करताना देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आपले पंतप्रधान हे खऱ्या अर्थाने वारकरी आहेत, असं त्यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे.
“तुकाराम महाराजांच्या शब्दांच्या धनात इतकी ताकद होती, की ते शब्द कुणी मिटवू शकले नाहीत. इंद्रायणीत बुडवा किंवा शिळेनं बंद करा. पण ते तुकोबारायांचे शब्द होते, ते शब्द पुन्हा वर आले. त्या शब्दांनी जनाजनाला व्यापून घेतलं. त्यांनी जो मार्ग दाखवला होता त्या मार्गावर चालण्याचं काम आपले पंतप्रधान करत आहेत,” असंही फडणवीस यावेळी म्हणाले.’जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा’ हाच मंत्र पंतप्रधान मोदी यांनी स्वीकारला आणि गरीब कल्याणाची मोहीम हाती घेत रंजल्या गांजल्यांसाठी काम करत आहेत. म्हणून आपले पंतप्रधान खऱ्या अर्थाने वारकरी आहेत, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी मोदींच्या कामाचं कौतुक केलं आहे.त्यांनी आपल्या भाषणात पुढे म्हटलं की, “वारकऱ्यांमध्ये कुणी मोठं नसतं, कुणी छोटं नसतं, सगळे वारकरी सेवक असतात, आपले पंतप्रधान ‘प्रधानसेवक’ आहेत. त्यामुळे सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास हेच तर वारकरी संप्रदाय सर्वांना सांगतो. तेच काम मोदी करत आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी संपूर्ण जगासाठी जे पसायदान मागितलं, संपूर्ण जग आपलं आहे, हा संदेश दिला. नरेंद्र मोदी यांनी देखील करोना काळात संपूर्ण जगाला लसीकरणाचा पुरवठा केला. मोदी यांनी खऱ्या अर्थाने भागवत धर्माचा विचार सामान्य माणसापर्यंत पोहोचवत आहे,” असंही फडणवीस यावेळी म्हणाले.