पत्रकारास गावगुंडामार्फत धमकीप्रकरणी गटविकास अधिका-यावर गुन्हा दाखल करा
आष्टी – पत्रकार अनिरुद्ध धर्माधिकारी यांना गावगुंडामार्फत धमकी देणा-या गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांच्यावर कारवाई करावी या मागणीचे निवेदन पत्रकारांनी गुरुवारी तहसीलदार यांना दिले.
——–
पत्रकारास गावगुंडामार्फत धमकीप्रकरणी
गटविकास अधिका-यावर गुन्हा दाखल करा
———-
आष्टीत पत्रकारांची तहसीलदारांना निवेदनाद्वारे मागणी
———-
आष्टी : 15व्या वित्त आयोगाची माहिती विचारल्याचा राग मनात धरून गावगुंडामार्फत पत्रकारास धमकी देणा-या गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी येथील पत्रकार संघटनांचे पदाधिकारी व सदस्यांनी तहसीलदार यांच्याकडे केली. याबाबत आज (ता. 19) तहसीलदारांना निवेदन देण्यात आले असून कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, आष्टी येथील दैनिक सकाळचे तालुका बातमीदार अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी आष्टी तालुक्यातील विविध विषयांवर सातत्याने लक्षवेधी लिखाण करणारे पत्रकार म्हणून जिल्ह्यात ओळखले जातात. अनेक विषय हाताळून त्यांनी दीन-दलित, गरजू, अपंग, शेतकरी, वंचितांचा आवाज बुलंद करण्याचे काम केलेले आहे. नुकतेच दैनिक सकाळमध्ये पंचायत समितीच्या रोहयो कक्षाला महिनाभरापासून कुलूप असल्याचे व लाभार्थींना ऐन उन्हाळ्यात कर्मचारी शोधत फिरण्याची वेळ आल्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. त्याच दिवशी हा कक्ष सुरू होऊन लाभार्थींची गैरसोय दूर झाली होती.
दरम्यान, पंचायत समितीमार्फत पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत विविध कामे झाल्याचे किंवा सुरू असल्याचे सांगितले जाते. याबाबत बातमीच्या अनुषंगाने तोंडी माहिती मिळविण्यासाठी (माहिती अधिकार कायद्याअंतर्गत नव्हे) धर्माधिकारी हे बीडीओ सुधाकर मुंडे यांना भेटले होते. परंतु माहिती देणे बहुदा अडचणीचे ठरणार असल्याने मुंडे यांनी ती देण्यास टाळाटाळ केली. यासंदर्भात दोन-तीन वेळा पाठपुरावा करूनही माहिती मिळाली नाही.
याच दरम्यान पुणे येते कौटुंबिक कार्यक्रमात असताना बद्री जगताप याने फोनवरून श्री. धर्माधिकारी यांना धमकावले. गावगुंड एवढीच ओळख असलेल्या जगताप व धर्माधिकारी यांचे यासंदर्भात बोलणेही झालेले नव्हते. एका प्रत्यक्षदर्शीनुसार यावेळी बीडीओ मुंडे हेही शेजारीच बसलेले होते. त्यामुळे भ्रष्टाचार दडपण्यासाठी व माहिती देणे अडचणीचे ठरण्याची भीती वाटल्याने बीडीओ मुंडे यांनीच गावगुंडाच्या आश्रयाला जाऊन पत्रकाराला धमकावल्याचे दिसून येत आहे.
माहिती मागितल्याचा राग मनात धरून गावगुंडामार्फत पत्रकाराला धमकावणारे गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करत योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी गुरुवारी पत्रकारांनी तहसीलदारांकडे निवेदन देत केली. त्वरित कारवाई न झाल्यास तालुक्यातील पत्रकार संघटना आंदोलन करतील, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
या वेळी पत्रकार उत्तम बोडखे, भीमराव गुरव, शरद तळेकर, शरद रेडेकर, संतोष सानप, निसार शेख, राजेंद्र जैन, गणेश दळवी, मुजाहिद सय्यद, कासम शेख, कृष्णा पोकळे, गोपाल वर्मा, अंकुश तळेकर, संदीप जाधव, रहेमान सय्यद आदी उपस्थित होते.