पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव संसदेत मंजूर, इम्रान खान यांचं सरकार कोसळलं
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव संसदेत मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे इम्रान खान यांचं सरकार कोसळलं आहे.
पाकिस्तानच्या संसदेत मध्यरात्री नाट्यमय घडामोडींदरम्यान हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.प्रस्तावाच्या बाजूने 174 मते पडली.
विरोधी पक्षनेत्या मरियम नवाझ शरिफ यांनी ट्विट करत म्हटलं की, “माझ्या लाडक्या पाकिस्तानचे दुःस्वप्न संपले आहे. आता ही दुरुस्तीसाठीची वेळ आहे.”तर PML-N पक्षाचे अध्यक्ष शाहबाज शरीफ यांनी सभागृहाला संबोधित करताना म्हटलं, ” आम्ही आता पाकिस्तानात पुन्हा एकदा संविधान आणि कायद्याचं राज्य स्थापित करू इच्छितो. आम्ही कुणाची इर्षा वा द्वेष करणार नाही. पण कायदा आपलं काम करत राहील.”
पीपीपी पक्षाचे अध्यक्ष बिलावल भुट्टो यांनीही याप्रसंगी भाषण केलं. ते म्हणाले, 10 एप्रिल या तारखेला ऐतिहासिक महत्व आहे. याच दिवशी 1973 साली पाकिस्तानचं संविधान पारित करण्यात आलं होतं. जुन्या पाकिस्तानात तुमचं स्वागत आहे.
तर दुसरीकडे पाकिस्तानचे अॅटर्नी जनरल खालिद जावेद यांनीही राजीनामा दिला आहे.