एसटी कर्मचारी भडकले, सिल्वर ओकवर चप्पल फेक, दगडफेक, सुप्रिया सुळेंची शांततेची विनंती !
मुंबई : संपकरी एसटी कर्मचारी प्रचंड भडकले असून त्यांनी शरद पवारांचे मुंबईचे निवासस्थान सिल्वर ओक वर धडक मारून दगडफेक आणि चप्पल फेक केली आहे.शरद पवार यावेळी घरातच असून खासदार सुप्रिया सुळे यांनी तात्काळ बाहेर येऊन शांततेची विनंती केली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर कालच न्यायालयाने विलीनीकरण सोडून बाकी काही मागण्या मान्य करण्याचे आदेश ठाकरे – पवार सरकारला काढले होते. त्या वेळी काही कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला होता. पण आज दुपारी तीन वाजल्यानंतर अचानक एसटी कर्मचारी आणि त्यांचे काही कुटुंबीय शरद पवार यांचे निवासस्थान सिल्वर ओक येथे पोहोचले आणि त्यांनी अचानक हल्लाबोल करत सिल्वर ओकवर दगडफेक आणि चप्पल फेक केली.
यामुळे परिसरामध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला असून तात्काळ खासदार सुप्रिया सुळे या बाहेर आल्या आणि त्यांनी कर्मचाऱ्यांना मी तुमच्याशी शांततेत बोलायला तयार आहे. माझी विनंती आहे तुम्ही माझ्याशी शांततेत चर्चा करा या गोंधळाच्या परिस्थितीत चर्चा करता येणार नाही. अशी विनंती केली. परंतु, एसटी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय कोणत्याही स्थितीत विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम होते. त्यांचा एक नेता पाटील यांना पोलिसांनी पकडून व्हॅनमध्ये घालून नेले. त्याला सोडवण्यासाठी कर्मचारी जास्त आक्रमक झाले. त्यांच्यासमवेत यावेळी कुटुंबीय देखील होते सुप्रिया सुळे यांनी वारंवार विनंती करूनही कर्मचारी त्यांचे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.