पाकिस्तानच्या पॅरामिलिटरी फोर्सच्या तळावर दहशतवादी हल्ला,दहशतवादयांचे अफगाणिस्तानात लपून पाकिस्तानी सैन्यावर हल्ले
खैबर : पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील पॅरामिलिटरी फोर्सच्या तळावर मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात तीन दहशतवादी ठार झाल्याचे सांगितले जात असून २२ अन्य जखमी झाले आहेत.
सर्व जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. यामध्ये लष्कराचे किती लोक जखमी किंवा मारले गेले आहेत, याची पुष्टी अद्याप झालेली नाही. आत्मघाती बॉम्बहल्ले करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. हल्लेखोर बॉम्ब लावून कॅम्पमध्ये घुसले होते. या हल्ल्यासाठी टीटीपीला जबाबदार धरले जात आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनुसार दहशतवादी नूशकी आणि पंजगुरच्या स्टाईलमध्ये हल्ले करत होते. या दोन ठिकाणी दहशतवादी अनेक दिवस लष्कराच्या कॅम्पमध्येच लपले होते आणि त्यांनी डझनभर सैनिकांना मारले होते.
आताच्या हल्ल्यातील दहशतवाद्यांकडे अमेरिकी शस्त्रास्त्रे होती. ३ दहशतवाद्यांचे मृतदेह घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले आहेत. तसेच या भागात जाणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही, परंतू तहरीक-ए-तालिबानवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. हे दहशतवादी अफगाणिस्तानात लपतात आणि पाकिस्तानी सैन्यावर हल्ले करतात. पाकिस्तानने अनेकदा तालिबानकडे हा मुद्दा मांडला आहे. मात्र त्यावर अद्याप कारवाई झालेली नाही. यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढू लागला आहे.