ठाणे: ठाण्यातील कळवा परिसरातील एका अल्पवयीन गतीमंद मुलीसोबत चॉकलेटचे आमिष दाखवून अतिप्रसंग करणाऱ्या एक व्यक्तीला कळवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे आरोपी हा विवाहित असून त्याला तीन मुले आहेत.
ठाण्यातील कळवा येथील शांतीनगर परिसरात राहणाऱ्या एक 16 वर्षीय अल्पवयीन गतीमंद मुलीसोबत त्याच परिसरात राहणाऱ्या एका 36 वर्षीय व्यक्तीने अतिप्रसंग केल्याची घटना 6 मार्च रोजी घडली होती. श्रीकांत गणेश गायके असे या नराधम आरोपीचे नाव आहे. मुलगी गतीमंद असल्यामुळे केलेल्या कृत्याची कुणकुण कोणाला लागणार नाही असे समजून आरोपी गफील होता. मात्र मुलगी ही पूर्ण गतीमंद नसल्यामुळे तिने आपल्यासोबत घडलेला प्रकार काही प्रमाणात माहिती देत कुटुंबीयांना सांगितला.
कुटुंबातील एका सदस्याने याबाबतची तक्रार ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय बालक संरक्षण हेलपलाईन नंबर वर फोन करून दिली. या तक्रारीवरून जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी यांनी कळवा पोलिसांना घटनेची माहिती कळवली. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तपासाला सुरुवात केली. पीडित मुलीची विचारपूस केल्या नंतर मुलीने त्या व्यक्तीचे थोडक्यात वर्णन सांगितले. त्यानुसार पोलिसांनी तपास करून नराधम श्रीकांत गायके याला अटक केली.
श्रीकांतला ताब्यात घेऊन पोलिसांनी पोलीसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने ही कृत्य केल्याची कबुली पोलिसांना दिली. पोलिसांनी त्याच्याविरोधात भादवी कलम ३७६ सह पोस्को कलम ४, ६, १२ प्रमाणे गुन्हा नोंद करत २६ मार्च रोजी आरोपील अटक केली. श्रीकांत गायके हा विवाहित असून तीन मुलांचा बाप आहे. तसेच तो आरोपी गेल्या काही महिन्यांपूर्वी या परिसरात राहण्यासाठी आला असून तो नालेसफाई आणि बांधकाम सारखे मंजूरी काम करत होता. या परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन गतीमंद मुलीवर त्याची नजर पडली आणि त्यानंतर त्याने मुलगी गतीमंद असल्याचा फायदा घेत तिला चॉकलेटचे आमिष दाखवून बंद पडलेल्या मफतलाल कंपनीच्या जागेतील दाट झाडी झुडपातील एका खड्ड्यात तिच्यावर अत्याचार केला.