अज्ञात वाहनाच्या धडकेत शिवसेनेचे तालुका उपप्रमुख गणेश मोरे यांचा मृत्यू
बीड : बीडहुन लिंबागणेश येथे गावी दुचाकीवरून जात असतांना दुचाकीला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत शिवसेनेचे तालुका उपप्रमुख गणेश गोपाळराव मोरे (वय ४०) यांचा रस्त्यावर पडून डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी संध्याकाळी साडेसात वाजता बीड- मांजरसुंबा महामार्गावरील हॉटेल बळीराजासमोरील मंझेरी फाटा येथे घडला.
शिवसेनेचे तालुका उपप्रमुख गणेश गोपाळराव मोरे ( वय ४० रा.लिंबागणेश ) हे शुक्रवारी संध्याकाळी साडेसात वाजता बीडहुन लिंबागणेश या त्यांच्या गावी दुचाकी (एम.एच.२३ ए.व्ही ००१७ ) ने निघाले होते. वाटेत बीड- मांजरसुंबा महामार्गावर मंझेरी फाट्यावरील हॉटेल बळीराजा समोर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली
या अपघातात ते दुचाकीसह रस्त्यावर कोसळुन डाेक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच बीड ग्रामीण ठाण्याचे पोलीस पीएसआय डी.बी आवारे, जमादार आनंद मस्के, मदतनीस जी. व्ही. कांदे वाहनचालक खय्युम खान यांच्यासह महामार्ग पोलिसांनी अपघातस्थळी भेट देवुन पाहणी केली. तर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांनी पदाधिकाऱ्यांसह जिल्हा रूग्णालयात भेट देवुन परिस्थीती जानुन घेतली. पोलिसांनी गणेश मोरे यांचा मृतदेह ताब्यात घेवुन तो बीड जिल्हा रूग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. मोरे यांच्या पश्चात आई ,एक भाऊ ,पत्नी, मुलगा असा परिवार आहे.
————–
लिंबागणेशवर शोककळा
बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील गणेश गोपाळ मोरे हा एक सामान्य कुटूंबातील तरूण कबड्डी खेळाडू होता. मागील २० वर्षापासून शिवसैनिक म्हणून काम करत असतांना त्याची काही वर्षापूर्वी बीड तालुका उप प्रमुख म्हणून निवड झाली होती. बालाघाटावर शिवसेनेचा एक परिचीत व दांडगा जनसंपर्क असलेला युवा नेता म्हणून त्याची ओळख होती. गावात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या माध्यमातुन कबड्डी ,व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजीत करून नवनीवन खेळाडू तयार व्हावेत यासाठी तो धडपडत होता. त्याच्या अपघाती मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे.