नायझेरियन नागरिकाकडे २७४ ग्रॅम कोकेन व ६० ग्रॅम मेफेड्रॉन पावडर (एम.डी.) असा एकुण १ कोटी १२ लाख रुपये किंमतीचे ड्रग्ज आढळले
ठाणे : आफ्रिकेतून तस्करी करून भारतात आणलेल्या कोकेनसह मेफेड्रॉन पावडर या ड्रग्जची विक्री करणाऱ्या नायझेरियन नागरिकास अटक करण्यात आली.ठाणे गुन्हे शाखा, वागळे युनिटच्या पथकाने घोडबंदर रोड परिसरात ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या ड्रग्ज पेडलरकडे एकुण १ कोटी १२ लाख रुपये किंमतीचे ड्रग्ज आढळून आले आहे.२७ जानेवारी २०२२ रोजी संध्याकाळी घोडबंदर रोड वरील आनंदनगर नाका, कासारवडवली, ठाणे येथे एक नायजेरियन इसम हा कोकेन व मेफेड्रॉन पावडर (एम.डी.) हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखा, वागळे युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली. पोलीस पथकाने या ठिकाणी सापळा रचला.पाेलिसांनी एका नायझेरियन नागरिकास ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे २७४ ग्रॅम कोकेन व ६० ग्रॅम मेफेड्रॉन पावडर (एम.डी.) असा एकुण १ कोटी १२ लाख रुपये किंमतीचे ड्रग्ज आढळून आले. डिक्सन चिडीबेरे इझे, (वय ३० वर्षे, रा. संघर्षनगर, चांदीवली, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या नायजेरियन नागरिकाचे नाव आहे. त्याचे विरुध्द कासारवडवली पोलीस स्टेशन ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक अरूण क्षीरसागर करीत आहेत.