राज याने नाबाद 162 धावा करत भारतीय फलंजाज शिखर धवनचा 17 वर्ष जुना रेकॉर्ड तोडला आहे. शिखरने 2004 मध्ये स्कॉटलँडविरुद्ध 155 धावा केल्या होत्या. अंडर 19 विश्वचषकातील ही भारतीय फलंदाजाने केलेली सर्वोच्च धावसंख्या होती.
वेस्टइंडीजमध्ये सुरु असलेल्या अंडर 19 विश्वचषक स्पर्धेत (ICC U-19 World Cup) धमाकेदार प्रदर्शन कायम ठेवलं आहे. भारतीय संघाने युगांडाचा 326 धावांनी दारुण पराभव केला आहे.भारताचा हा सलग तिसरा विजय आहे. या विराट विजयासह भारतीय संघाने क्वार्टरफाइनलमध्ये धडक मारली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धिरित 50 षटकांत पाच गड्यांच्या मोबदल्यात 405 धावांचा डोंगर उभा केला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना युगांडाचा संघ 19.4 षटकांत फक्त 79 धावा करु शकला. युगांडा संघाच्या नऊ फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही ओलांडता आली नाही. कर्णधार Pascal Murungi याचा अपवाद वगळता एकाही युगांडाच्या फलंदाजाला आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. भारतीय संघाकडून निशांत सिंधू याने सर्वाधिक चार विकेट घेतल्या.
दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना भारताने तब्बल 405 धावा स्कोरबोर्डवर लावत कमाल केली. यामध्ये अंगकृष रघुवंशी (Angkrish Raghuwanshi) आणि राज बावा (Raj Bawa) यांनी अप्रतिम शतकं लगावली आहेत. याआधी भारताने अंडर 19 विश्वचषक स्पर्धेत 2004 मध्ये स्कॉटलँडविरुद्ध 425 रन केले होते. सामन्यात नाणेफेक जिंकत युगांडा संघाने गोलंदाजी घेतली. इथेच त्याच्यांकडून मोठी चूक झाली कारण भारतीय संघाने याच गोष्टीचा फायदा उचलत धमाकेदार फलंदाजी केली. हरनूर सिंग, निशांत संधू प्रत्येकी 15 धावा करुन बाद झाले. पण अंगकृष आणि राज बावा यांनी डाव सांभाळत भारताला मोठी आघाडी मिळवून दिली. यामध्ये अंगकृष याने 144 धावा केल्या. त्याने 120 चेंडूत 22 चौकार आणि चार षटकार लगावले. तर राज याने तब्बल 162 नाबाद धावा केल्या. त्याने 108 चेंडूत 14 चौकार आणि आठ षटकार ठोकले.