नवी दिल्ली: कोरोना आणि ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत नाईट कर्फ्यू आणि वीकेंड कर्फ्यूसह विविध निर्बंध लावण्यात आले आहेत.
इतकेच नाही तर या काळात कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्याची महत्त्वाची जबाबदारी दिल्ली पोलिसांवर आहे. पण, यादरम्यान दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मास्क घालण्यास सांगितल्यामुळे संतापलेल्या व्यक्तीने पोलिसांसमोरच आपल्या बंदुकीतून पाच गोळ्या झाडल्या आहेत. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, गोळ्या झाडणारा आदेश हा व्यवसायाने वकील आहे. शनिवारी रात्री उशिरा कर्फ्यू दरम्यान सीमापुरी चौकात कार चालवताना पोलिसांनी त्याला पाहिले आणि त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. यामुळे तो संतापला आणि त्याने आणि पत्नी-बहिणीने पोलिस कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केले.
जमिनीत पाच गोळ्या झाडल्या
त्यानंतर आरोपीने पोलिसांशी वाद घातला आणि त्याच्या परवाना असलेल्या पिस्तुलाने जमिनीवर पाच गोळ्या झाडल्या. यादरम्यान इतर पोलिसही तेथे पोहोचले. आरोपी दारुच्या नशेत असावा, असे पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेसंदर्भात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.