क्राईम

‘ती फक्त माझी आहे’ मामीच्या प्रेमात भाचा वेडा, मामाला केला आडवा..


इंदूर : मध्य प्रदेशची आर्थिक राजधानी असलेल्या इंदूर शहरामध्ये एका व्यक्तीचा खून झाला. धक्कादायक बाब म्हणजे हा खून मृत व्यक्तीच्या भाच्याने केला आहे. आरोपीचे मृत व्यक्तीच्या पत्नीशी (आरोपीची मामी) प्रेमसंबंध होते.

त्यामुळे त्याने आपल्या मामाचा खून केला. एवढंच नाही, तर त्याने या खुनाला अपघाताचं स्वरूप देण्याचाही प्रयत्न केला. या प्रकरणात मृताची पत्नी आणि मित्रांचाही सहभाग होता. मृत व्यक्तीच्या मुलाचा जबाब आणि मोबाइल कॉल डिटेल्सवरून या खुनाचा उलगडा झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून चारही आरोपींना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, द्वारकापुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. मृताचा दगडाने ठेचून खून केल्याचं प्राथमिक तपासात दिसून आलं. पोलिसांनी आजूबाजूच्या परिसराची पाहणी करून फॉरेन्सिक सायन्स लॅबच्या (एफएसएल) पथकाला घटनास्थळी पाचारण केलं. हा मृतदेह रूपसिंग राठौर नावाच्या व्यक्तीचा असल्याचं तपासात निष्पन्न झालं. त्यानंतर पोलिसांनी मृताच्या घरी जाऊन अनेकांचे जबाब नोंदवले.

सहा वर्षांच्या मुलामुळे झाला खुनाचा उलगडा
मृत रूपसिंगला सहा वर्षांचा मुलगा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याचाही जबाब घेतला. मुलाने पोलिसांना माहिती देताना सांगितलं, की त्याच्या आई-वडिलांमध्ये दररोज खूप वाद होत असत. अनेक वेळा हे वाद हाणामारीपर्यंत पोहोचले होते. मुलाच्या जबाबानंतर पोलिसांनी रूपसिंगच्या पत्नीचे कॉल डिटेल्स तपासण्यास सुरुवात केली. मृताची पत्नी शुभम नावाच्या भाच्याशी खूपदा फोनवर बोलत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. या कॉल डिटेल्समधून दोघांमधल्या प्रेमसंबंधांची माहिती पोलिसांना मिळाली.

पुरावे हाती आल्यानंतर पोलिसांनी शुभम आणि रूपसिंगच्या पत्नीला ताब्यात घेऊन चौकशी केली. सुरुवातीला दोघांनीही पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला; पण पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. त्यानंतर पोलिसांनी या दोघांसह त्यांच्या दोन साथीदारांना अटक केली.

सध्याच्या काळात प्रेमप्रकरणाशी संबंधित गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एकतर्फी प्रेमातून खून करणं, विवाहित प्रेयसीचा किंवा तिच्या पतीचा खून करणं असं या गुन्ह्यांचं स्वरूप असतं. काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशमध्ये एका फायनान्स कंपनीच्या ब्रँच मॅनेजरने आपल्या विवाहित प्रेयसीचा खून केल्याची घटना घडली होती.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *