शिवमोग्गा येथे वैद्यकीय विद्यार्थ्याने भाड्याच्या खोलीत सुरु केली गांजाची शेती; पोलिसांकडून तिघांना अटक, गुन्हा दाखल
विद्यार्थी महाविद्यालयात अभ्यासासाठी प्रवेश घेतात. विद्यार्थ्यांसह त्यांचे कुटुंब आणि शिक्षक देखील विद्यार्थी चांगला अभ्यास करून यशस्वी होण्याचे ध्येय बाळगून असतात. मात्र काही वेळा काही विद्यार्थी भरकटतात.
ते चुकीच्या लोकांच्या संगतीत येतात आणि गुन्हेगारीच्या जगात पाऊल ठेवतात. असाच काहीसा प्रकार कर्नाटकातील शिवमोग्गा येथे समोर आला आहे. कर्नाटकमधील शिवमोग्गा पोलिसांनी तीन वैद्यकीय विद्यार्थ्यांना गांजाची लागवड आणि विक्री केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.
शिवमोग्गा येथे विद्यार्थ्यांनी त्यांच्या भाड्याच्या घरात चक्क गांजाची शेती सुरू केली. त्यानंतर ते त्याची विक्री करू लागले. ही बाब समोर आल्यानंतर आता या प्रकरणी पोलिसांनी तामिळनाडू आणि केरळमधील तीन विद्यार्थ्यांना अटक केली आहे. हे विद्यार्थी त्यांच्या भाड्याच्या घरात हायटेक शेती करून गांजा पिकवत होते. कर्नाटक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विघ्नराज असे मुख्य आरोपीचे नाव आहे, जो तामिळनाडूमधील कृष्णगिरीचा रहिवासी आहे. विघ्नराज हा एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे आणि त्याच्या भाड्याच्या घरात गांजा पिकवताना आढळून आला आहे.