अवघ्या 15 लाखांच्या रूमचा वाटा मिळण्यावरून वाद झाल्यानं पुतण्यांनी सख्ख्या काकांचा भररस्त्यात खून केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली.
याप्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी अवघ्या 3 तासात तिन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. उल्हासनगरच्या कॅम्प 3 मधील फॉलोवर लेन परिसरात मरोठीया कुटुंबियांची एक रूम आहे. मरोठीया कुटुंबात 4 भाऊ असून, त्यापैकी धर्मवीर कालीचरण मरोठीया या एका भावाचं निधन झालं आहे. त्यामुळे या रुमचे चार ऐवजी तीनच वाटे करावेत, अशी इतर भावांची मागणी होती. मात्र दिवंगत धर्मवीर याच्या परिवाराचा त्याला विरोध होता. यातूनच कुटुंबात सतत वाद सुरू होते. याच वादातून कुटुंबात हाणामारी सुद्धा झाली होती.
पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात असताना आरोपींनी गाठले
याबाबत तक्रार देण्यासाठी आज सकाळी मनवीर कालीचरण मरोठीया, रामपाल कालीचरण मरोठीया आणि राखी रामपाल मरोठीया हे तिघे मध्यवर्ती पोलीस ठाण्यात येत होते. यावेळी भोलू उर्फ योगेंद्र धर्मवीर मरोठीया, शालू उर्फ गणेश धर्मवीर मरोठीया आणि त्यांचा जावई आकाश रामजीलाल वाल्मिकी या तिघांनी त्यांना फॉलोवर लेन चौकात गाठलं आणि जीवघेणा हल्ला चढवला. या हल्ल्यात मनवीर कालीचरण मरोठीया यांचा मृत्यू झाला, तर रामपाल कालीचरण मरोठीया आणि राखी रामपाल मरोठीया हे दोघे जखमी झाले.
अवघ्या तीन तासात आरोपींना अटक
या हल्ल्यानंतर तिन्ही आरोपी मुंबईला पळून गेले, मात्र पोलिसांनी अवघ्या 3 तासात त्यांच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणात पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून, आरोपींची आई सुनीता धर्मवीर मरोठीया हिलाही आरोपी केल्याची माहिती मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली.
ज्या रुमचे वाटे करण्याकरून हा सगळा वाद झाला, त्याची किंमत अवघी 15 लाख रुपये इतकी आहे. त्यामुळे 15 लाखांचे तीनच वाटे करण्याची 3 भावांची मागणी होती. तर एका मृत भावाच्या मुलांनी मात्र आपल्याला डावललं जात असल्याच्या भावनेतून हे टोकाचं पाऊल उचललं आणि थेट काकांवरच हल्ला चढवत त्यांचा खून केला. त्यामुळं उल्हासनगर शहरात मात्र खळबळ माजली आहे.