- हवामान बदलाचा परिणाम की अन्य कारण? आरोग्य विभागाने लक्ष देण्याची होत आहे मागणी
बीड : आष्टी तालुक्यात मागील काही दिवसापासून सकाळी व रात्री थंडी तर दुपारी कडक ऊन निसर्गाच्या या लहरीपणामुळे सर्व सामान्य नागरिकांच्या आरोग्यावर चांगलाच परिणाम होत असून खाजगी व सरकारी रुग्णालयात सर्दी, ताप व खोकला तसेच डोकेदुखी आशा रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने
हा हवामान बदलाचा परिणाम की अन्य कारण? त्यामुळे आरोग्य विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.
आष्टी तालुक्यात मागील काही दिवसांपासून हवामानात बदल झाला आहे. तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस ही पडला आहे. हिवाळ्याच्या अंतिम टप्पा अन् उन्हाळ्याचा प्रारंभ यामुळे सर्वत्र वातावरणात बदल निर्माण झाला. त्यामुळे सकाळी व रात्री थंडी तर दुपारी कडक ऊन असे दुहेरी वातावरण मानवी आरोग्यावर परिणामकारक ठरत आहे. यामुळे ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी अशा आजारांचा त्रास अनेकांना होवू लागला आहे. यामुळे खाजगी व सरकारी रुग्णालयात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तर दुसरीकडे जगभरात कोरोनाचा फैलाव पुन्हा होत असल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण तयार होत आहे. कोरोनाची तिसरी लाट जीवावर बेतणारी नसली तरी किरकोळ आजार समजून नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष करु नये. तसेच व्हायरल इन्फेक्शनची लक्षणे आढळून आल्यास रुग्णांनी गाफील न राहता वैद्यकीय सल्ला घेऊन जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन कोरोना चाचणी करुन घेणे आवश्यक असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. जयश्री शिंदे यांनी सांगीतले.
——
सद्याच्या बदलत्या तापमानामुळे व्हायरल इन्फेक्शनचे प्रमाण वाढल्यामुळे सर्दी ताप खोकला डोकेदुखी आजाराचे रुग्ण संख्या वाढत आहे. नागरीकांनी कोरोनासारख्या आजाराबाबत काळजी घेवून घाबरून न जाता, घराबाहेर पडताना नागरीकांनी तोंडाला मास्क लावावे. तसेच शासन नियमावलीचे पालन करुन आरोग्याची योग्य ती काळजी घेतली पाहिजे.
– डाॅ. नितीन मोरे, वैद्यकीय अधिकारी टाकळसिंग