ताज्या बातम्या

एकनाथ शिंदेंचे चिरंजीव दोन वेळा.”, संजय राऊतांचं श्रीकांत शिंदेंवर टीकास्र; म्हणाले, “हेच लोक.!”


जवळपास वर्षभरापूर्वी शिवसेनेत पक्षाच्या इतिहासातली सर्वात मोठी फूट पडून उद्धव ठाकरेंचं सरकार कोसळलं. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी भाजपाशी हातमिळवणी केली. मग सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का देत देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारत एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं.

यानंतर शिवसेनेतील शिंदे गट व ठाकरे गट या दोन गटांमध्ये गेल्या वर्षभरात आरोप-प्रत्यारोपांचं बरंच राजकारण रंगलं. अजूनही दोन्ही बाजूंनी टीका करण्याची एकही संधी सोडली जात नसताना आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना लक्ष्य केलं आहे. श्रीकांत शिंदेंनी लोकसभेत केलेल्या भाषणावरून राऊतांनी टीका केली आहे.

नेमकं काय घडलं?

खासदार श्रीकांत शिंदेंनी दोन दिवसांपूर्वी मोदी सरकारविरोधातील अविश्वास ठरावावर केलेल्या भाषणात ठाकरे गटावर हल्लाबोल केला. “महाविकास आघाडी सरकार असताना सर्व कामे थांबवण्यात आली. कारण, उद्धव ठाकरे घराच्या बाहेर निघत नव्हते. अडीच वर्षांत अडीच दिवसच मंत्रालयात जाण्याचा विक्रम उद्धव ठाकरे यांनी केला होता. २०१९ साली भाजपा आणि शिवसेनेला लोकांनी बहुमत दिलं होतं. पण, निवडणुकीनंतर महाविकास आघाडी स्थापन झाली. बाळासाहेबांचे विचार विकून हिंदुत्वापासून लांब जाण्याचं काम त्यांनी केलं. १३ कोटी लोकांबरोबर गद्दारी यांनी केली”, असं शिंदे म्हणाले.

दरम्यान, संजय राऊतांनी आज सामनातील रोखठोक या सदरात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देवेंद्र फडणवीस, नारायण राणे, श्रीकांत शिंदे यांच्यावरही हल्लाबोल केला. “फडणवीस वगैरे लोक नेहमी सांगतात, ‘आम्ही ‘सामना’ वाचत नाही.’ पण त्यांचे सर्वोच्च बॉस ‘सामना’ची दखल घेतात व त्यावर भाष्य करतात हे चांगल्या नेत्याचे लक्षण”, असा टोला राऊतांनी लगावला आहे.

भाषणांवर आक्षेप

दरम्यान, या लेखात संजय राऊतांनी नारायण राणे व श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत केलेल्या भाषणांवर आक्षेप घेतले आहेत. “भाजपचे ‘नागडे पोपटलाल’ शिवसेना नेत्यांवर करतात तसे कमरेखालचे वार व खोटे आरोप केले नाहीत. मोदी मंत्रिमंडळातील महाराष्ट्राचे एक मंत्री नारायण राणे यांनी अविश्वास ठरावाच्या वेळी लोकसभेत केलेले भाषण मोदी यांनी ऐकायला हवे. महाराष्ट्राच्या उदात्त संस्कृतीची लाज घालवणारे ते भाषण होतं”, असं राऊत म्हणालेत.

“देवेंद्र फडणवीसांचे सर्वोच्च बॉस.”, संजय राऊतांचा खोचक टोला; मोदींच्या ‘त्या’ वाक्याचा केला उल्लेख!

“श्रीकांत शिंदेंची भाषा.”

“धोरणांवर टीका करणे हे वेगळे व खालच्या पातळीवर जाऊन वैयक्तिक टीका करणे वेगळे. एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव हे उद्धव ठाकरे यांच्या कृपेने दोनदा खासदार झाले. त्यांनी संसदेत वापरलेली भाषा ही भाजपच्या नव्या संस्कृतीला शोभणारी आहे व हेच लोक आता भाजपच्या अधोगतीला कारणीभूत ठरणार आहेत”, असं राऊतांनी या लेखात म्हटलं आहे.

VIDEO : गद्दारी, हिंदुत्व अन् शिवसेना; श्रीकांत शिंदे, अरविंद सावंत आणि नारायण राणे लोकसभेत भिडले

“२०२४ च्या विजयासाठी मोदी-शहांना दुसऱ्यांचे पक्ष फोडावे लागतात व भ्रष्टाचाऱ्यांची मोट बांधून त्यांची वारेमाप स्तुती करावी लागते. हाच त्यांचा पराभव आहे! २०२४ च्या मोठ्या पराभवाची ही सुरुवात आहे. विचार करणाऱ्या माणसाची विचार करण्याची सवय नाहीशी होईल अशा गोंधळाच्या कालखंडात आपण सध्या वावरत आहोत”, असंही राऊतांनी नमूद केलं आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *