मुंबई, (हिं.स.) रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीने केरळचे राज्यपाल आणि ज्येष्ठ विचारवंत श्री. आरिफ मोहम्मद खान यांचे ‘समान नागरी कायदा कशासाठी आणि कसा?’ या विषयावर व्याख्यान योजण्यात आले होते.
दि. 11 ऑगस्ट रोजी ठाणे येथील टीप टॉप प्लाझा येथील सभागृहात आयोजित योजलेल्या या प्रबोधनात्मक कार्यक्रमास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. तुडुंब भरलेल्या सभागृहाने श्री. आरिफ मोहम्मद खान यांच्या व्यासंगी आणि विचारसमृद्ध वक्तृत्वाचा आनंद घेतला.
एकात्मता ही समरसतेतून येते. म्हणूनच समरसता प्रस्थापित करण्यासाठी समान नागरी कायदा महत्त्वाचा ठरतो. तसेच समाजाचा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक असलेल्या ‘महिलांना समान न्याय मिळण्यासाठी’ हा कायदा प्रभावी ठरेल. समान न्यायाचे तत्त्व प्रत्यक्षात उतरवणे हाच समान नागरी संहितेचा मूळ उद्देश असून, तोच त्याचा परिणामही असणार आहे, हे श्री. खान यांनी सोदाहरण स्पष्ट केले. तसेच त्यांनी कायद्याबद्दल बुद्धिभेद करणाऱ्या, गैरसमज पसरवणाऱ्या घटकांचा यथोचित शब्दांत समाचार घेतला.
या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे कोणत्याही धर्मात-पंथात कोणाचाही हस्तक्षेप होणार नाही, कोणत्याही धर्मावर संकट न येता सर्वांचे धर्माधिकार अबाधितच राहणार आहेत, हेही त्यांनी स्पष्ट केले.
तिहेरी तलाक संबंधित कायदा लागू होतानाही विविध प्रकारचे हितसंबंध असणाऱ्या स्वार्थी घटकांनी असाच विरोध आणि बुद्धिभेद केला होता, याची श्री. खान यांनी आठवण करून दिली. तथापि तो कायदा लागू झाल्यानंतर कोणाच्याही धार्मिक अधिकारांवर गदा आली नाही, उलट तलाकचे प्रमाण सुमारे 95 टक्क्यांनी कमी होऊन असंख्य महिलांचे आणि परिवारांचे जीवनमान सुधारले, असे प्रतिपादन त्यांनी केले.
धार्मिक विविधता ही आम्हा भारतीयांची समस्या नसून ‘आम्ही विविधतेचा उत्सव साजरा करतो’. विविधतेचा मूळ स्रोत एकच आहे आणि त्या एका सत्याकडे जाण्याचे विविध मार्ग असू शकतात, अशा एकात्म विचारावर श्रद्धा असणारे आम्ही भारतीय आहोत. हजारो वर्षांपासून अनेक धर्म-पंथांना भारतीय भूमीवर सामावून घेणारे, सर्वसमावेशकतेची संस्कृती मानणारे आम्ही भारतीय आहोत, हे विचार ठामपणे मांडत श्री. खान यांनी अनेक दाखले दिले. अनेक प्राचीन धार्मिक संदर्भ, वेद-उपनिषदे-कुराण यांतील संदर्भ आणि स्वातंत्र्यपूर्व काळातील उदाहरणे अशा सखोल विचारमंथनाचा अनुभव श्रोत्यांनी घेतला.
सामाजिक प्रबोधन हा हे प्रबोधिनीच्या कार्याचे प्रमुख सूत्र आहे. म्हणूनच या समकालीन बहुचर्चित विषयावर ज्ञानमंथन घडण्यासाठी आम्ही हे व्याख्यान योजले. तसेच एखादा महत्त्वाचा कायदा बनताना लोकसहभाग महत्त्वाचा ठरतो ही गरज ओळखून हा कार्यक्रम योजण्यात आला, असे डॉ. कुलकर्णी प्रास्ताविक करताना म्हणाले. डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना श्री. खान यांचे अष्टपैलूत्व अधोरेखित केले. समान नागरी कायद्यावर अधिकारवाणीने बोलू शकणार्या मोजक्या लोकांपैकी एक श्री. खान आहेत, असे मत मांडले. शेवटी कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक श्री. सुजय पतकी यांनी आभार मानले. मोठ्या संख्येने उपस्थित असलेले पत्रकार, अभ्यासक, विचारवंत, साहित्यिक, लोकप्रतिनिधी, राजकीय कार्यकर्ते यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.