ताज्या बातम्या

देवेंद्र फडणवीसांना एक मेसेज अन् नेपाळमध्ये अडकलेले ५८ भाविक महाराष्ट्रात सुखरूप परतले


नेपाळमध्ये देवदर्शनासाठी गेलेले महाराष्ट्रातील तब्बल ५८ भाविक पर्यटन कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे नेपाळमध्ये अडकून पडले होते. संपत आलेले खिशातील पैसे आणि पर्यटन कंपनीने हात वर करत नेपाळमध्येच अडकवून ठेवल्याने त्यांना सुटकेचा मार्ग दिसत नव्हता.

या भाविकांनी मदतीसाठी अनेकांना फोन लावले मात्र त्याचाही उपयोग होत नव्हता. यादरम्यान या पर्यटकांबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका मेसेजद्वारे माहिती मिळाली. त्यानंतर मात्र वेगाने सूत्रं फिरून हे भाविक नेपाळमधून सुखरूपपणे उत्तर प्रदेशात आणि तिथू महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील आपल्या गावांमध्ये पोहोचले. या प्रसंगातून सुटका झाल्यानंतर भाविकांनी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

नेपाळमध्ये अडकलेल्या भाविकांपैकी एक असलेल्या संजू म्हात्रे यांनी सांगितले की, आम्ही रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील कामोठे गावातील ५८ जण नेपाळमध्ये धार्मिक पर्यटनासाठी गेले होते. यामध्ये ३५ महिला आणि २३ पुरुषांचा समावेश होता. गोरखपूरहून नेपाळपर्यंत आम्ही व्यवस्थित पोहोचलो. तेथील लुंबीनी, पोखरा, जनकपुरी, मनोकामना य़ेथील मंदिरांचं दर्शन घेतलं. मात्र, काठमांडूला आल्यावर आम्हाला राधाकृष्ण ट्रॅव्हल्सच्या एका बसमध्ये कोंबण्यात आलं. आम्ही गावाहून निघतानाच सर्व पैसे भरलेले होते. मात्र, तिथे आमची फसवणूक झाली. तुमच्या पर्यटन कंपनीकडून पैसे आले नाहीत. सहा लाख रुपये दिले नाहीत तर सोडणार नाही, अशी धमकी या ट्रॅव्हल्सचा मालक अंकीत जायस्वाल आणि त्याच्या साथीदारांनी दिली. तसेच आम्हाला धमकावण्यास सुरूवात केली. परक्या देशात उद‌्भवलेल्या या प्रसंगामुळे काय करायचे? हा प्रश्न आमच्यासमोर उभा राहिला. आम्ही ओळखीच्या लोकांमार्फत नेत्यांना आणि त्यांच्या पीएंना फोन करायला सुरुवात केली. पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळेना. शेवटी मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेसेज करून आपल्यावर गुदरलेला प्रसंग सांगितला. त्यानंतर फडणवीस यांनी तातडीने प्रतिसाद आला. त्यांनी माहिती घेतली. लगेचच फडणवीस यांचे खासगी सचिव दिलीप राजूरकर आणि दिल्लीतील स्वीय सहायक मनोज मुंडे यांनी या भाविकांशी संपर्क साधला.

देवेंद्र फडणवीस यांच्या टीमने मूळचे नेपाळचे असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे माजी स्वीय सहायक संदीप राणा यांना कळविले. राणा यांनी स्वत: या भाविकांची भेट घेतली व सर्व भाविकांची व्यवस्था करून विशेष बसने त्यांना गोरखपूरला पोहोचविले. देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संपर्क साधला होता. त्यामुळे भाविक गोरखपूरला पोहोचल्यावर तेथील जिल्हाधिकारी स्वत: भेटीला आले. त्यांनी दोन दिवस भाविकांची निवासाची आणि भोजनाची व्यवस्था केली. त्यांना मुंबईपर्यंत कसे न्यायचे प्रश्न होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून गोरखपूरपासून मुंबईपर्यंत खास बोगी जोडण्याची विनंती केली. रेल्वेने त्याप्रमाणे भाविकांसाठी गोरखपूरहून मुंबईपर्यंत रेल्वेची एक बोगी आरक्षित करून दिली. दोन दिवस प्रवास करून सर्व जण अखेर सुखरुपपणे मुंबईला पोहोचले.

भारताचा वाढता दबदबा! जयशंकर यांना भेटण्यासाठी व्लादिमीर पुतिन यांनी तोडला प्रोटोकॉल.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *